Posts

Showing posts with the label Marathi

लांडगे

गटांगळ्या खात पळून जाता जाता
यांनी तोडलेयत लचके, थोडे माणसांचे, मग माणसांनी केलेल्या कमाईचे, अन् खूप जास्त या व्यवस्थेचे. 
मुर्दाड लबाडीने  आपली वखवख पुरवत, हे उंडारतायत खुशाल इथं मागं उरलीयेत, लचक्यांची कुजकट शितं.
- Swati Vaidya February 23, 2018.

मृत्यू

हे मृत्यू,

कायमच तुझं येणं असतं अचानक! कधी, कुठे आणि कोणासाठीही आलास तरी; तुझं असणं जाणवतं ते संपलेल्या जीवनातूनच.
ज्यांचं कोणीतरी खास माणूस तू हिरावलंस, त्यांच्यावर झाकोळतात तुझ्या काळ-सावल्या, जसं महासागराला डागळणारी तेलगळती.
या सावल्या पण विचित्रच, आठवणींच्या विश्वाच्या सख्या.
चार दुःखी चेहर्यावरचे अश्रू बघून तुझ्याच अंधारात तू हसून घेतोस, तुझं स्वघोषित वर्चस्व गोंजारत.
पण त्या अश्रूंपाठचं प्रेम, मात्र शिल्लक उरतंच, अजेय, सदाकाळ; तुझ्या विध्वंसक उंडारण्याला पुरून उरतंच !

- Swati , Translation in Marathi, of a poem made in English, 2 days ago.

स्वातंत्र्याची सत्तरी

सत्तरीच्या म्हातार्यांंना नसते घरघर आजकाल, पण लागलाय चळ उगाळण्याचा जुनाट काळ;
काढत वाभाडे जळकट कोणी सुटले मोकाट, त्यांची सोईस्कर लेखणी सोशल मीडिया चिल्लर-अरभाट;
वीट वीट उचकटवत  देशात आणलाय वीट, कसे जगावे आज जगात पांघरून भेदाभेदाची चिरगुटं?;
देश सत्तरीचा झाला  अवकळा आल्यागत, आता गाठायची लढाई देशत्वाच्या अस्तित्वाची फक्त;
शांत डोक्याने विचार सावध पावलांचा खंबीर आचार, टिकवूया सत्तरीची वाटचाल बहुविविधतेला समरसतेची झालर;
आता नाही भरली आमची शंभरी करू बेचिराख त्यांना, ज्यांनी मतांच्या जोरावर आमच्या नोटांची मेख मारली.
- Swati August 15, 2017 00.00

बाळांनो

काल परवाची गोष्ट आहे  भेटलो होतो प्रथमच; जिकडे बनलो 'मी' आपण;
पाण्यात खेळता, खेळता  शिकलो आपण - हाताने पकडणं,  अलगद पाणी भरता, भरता भरभरून खेळलो आपण;
माहितीच नव्हते शब्दच मुळी, ना 'मित्र' ना 'मैत्री'; पण एकदम पहिले, एकमेकांचे  सवंगडी बनलो आपण;
लहानपणाचं अक्खं तप साथ - साथ घडलो आपण;
रोज रोजची जुनीच तरी नवीच वाटली  मस्ती - मारामारी,  चिडवा - चिडवी आणि  चिडण्या - रडवण्याची खुमारी अशा मैत्रीच्या नात्यात गुंफलो आपण;
अगदी आत्ताची गोष्ट आहे  की 'निरोप समारंभ' होताना  आपापल्या स्वप्नांसाठी  विखूरलो होतो आपण;
आज परत भेटताना  आपल्यातलं द्वाड मूल होऊन पुन्हा एकदा किलबिलाट करतो आपण;
आपापल्या 'मी' मधे दडलेले, 'आम्ही सारे' पुन्हा गवसतानां 'पुन्हा भेटूया' असं म्हणत  गहिवरतो आपण
- स्वाती ही कविता July 11, 2017 लागला केली व "बालमोहन ८७" च्या Reunion च्या वेळेस July 29, 2017 सुर्यवंशी सभागृह येथे प्रथम सादर केली.
प्रश्नटाळू

काय उपयोग मोठ्या छातीचा ?  नुसतीच जर मिरवायचीत मापं तर? ;
तसा तर केलाच आहे सामना,  अनेकांनी - जिवंत, ज्वलंत प्रश्नांचा, थेट हृदय शस्त्रक्रीयेनंतर पण; 
आहे नं जर दमदार हृदय?  तर मग करत का नाही,  'एक तास प्रश्नोत्तरांचा?,
ज्यात नाहीयेत ठरवलेल्या निर्णयांच्या आघोषणा, वा  थेट प्रक्षेपीत भाषणबाजीची नाटकं !!

-स्वाती मे 18 2017 16.49

संथ -स्वैर

Image
असतंच की, चलन - वलन
कुणालाच पत्ता न लागेलसं ;
कदाचित न कळेलसं स्वतःलाही तरीही गतिमान, सउद्देश चालणं ;
विनापर्वा, विनासोबत आपल्याच तालात - डौलात !

- Swati, March 19, 2017 22.00

उगवती

Image
क्षितीजाला फोडून आला 
सूर्य उघड्या जगती,
उगवतीचे रंग मिसळले अंतरीच्या आकाशयात्री ;
काय जे होऊन गेले  अन् काय पाठी राहिले , चिरनूतन जगण्याचे  सोहोळे पुढे ठाकले !
दृश्य, स्पर्श अन् ऐकलेल्या  वेदनांची याद आहे , क्षितीजाच्या उगवतीची  आशाभरी साद आहे .
- Swati January 29, 2017 7.38 am @ Jaipur

नकळत

चालताना भान असते
सोडलेल्या लाटांपाशी ;

थांबताना आवेग आवरे हुकवलेल्या कड्यांपाशी ;
कधीतरी ओढ लागते  सोनपिवळ्या चाहूलीची ;
हर नव्याचा आनंद आहे  न कशाचे अप्रूपही ;
जवळ आहे जे दूर गेले  अन् जवळ वाटे दूर जे अजूनही ;
थांबण्याची सक्ती नाही
अन् धावण्याची गरजही ;
काय अन् कसे हे करत जाते  या वयाचे व्यक्तित्वही .

- स्वाती January 19, 2017 6.45 am

ऐतिहासीक भारत

मित्रों, !!!!
....  म्हणाले की, "इतिहास घडवणारे भारत", कसला ढासू बाणेदार नायक याच्या बुलंद छातीचा गवगवा त्याला मुबारक
करून टाकली रद्दी , अचानक,  अगदी न भूतो न भविष्यती आत्मघातक भलतेच ऐतिहासीक कपाळमोक्ष कारक
बेहिशेबी निर्णय झाला टंचाईकारक लाखोंच्या सदर्यात भटकता प्रधानसेवक
म्हणतात आता की झाली एक 'चूक' ! सुलतानी लहरीने हरवली गरीबाची तहान - भूक
दोन हजारच्या टिकल्यांसाठी रांगारांगी, देशभक्तीचा काय पण हुरूप !
अच्छे अच्छे, अक्कलेचे, 'दीन-दीन' कारभारी अडाण्याच्या गाड्याचे भक्तगण लय भारी
बॅंका उलट्या अन् नोटा छोट्या  रसातळाची जोखीम तरी चोराच्या उलट्या ...
अभाव रोखतेचा? , की अभाव अकलेचा?, गप्पा विकासाच्या ? , की कारभार उलट्या काळजाचा? 
पण बघा , सांगितलेलं नं  की घडवणारे इतिहास भारत ? 

- स्वाती December 16 2016

कास

Image
धुक्यात ओघळते
रंगांचे ठिपके
जग-रहाटीला झुलत
वार्याला डोलत
उभे आपसूक आपल्या जोमात;

कुठे आभाळी निळाई,
अन् सोवळ्यागत तेरडा,
चंदेरी कुमुदिनी कलाकुसर पाण्यात;

काठाशी कंदीली खरचुडी
कोंडी किटक परागीकरणात
रम्य,गूढात दाटले समृद्ध सजीव;

इथे गाळली सीतेनं आसवं भरमार
व्हावी फुलं ही जगभर,
पण,
मिळूदे विश्रांती,
परागांदा सीतेच्या लेकींच्या
आसवांना जन्मभर;

दवबिंदूंचा अलगद डोलारा कोमल
अल्लड इटूकला ठिपक्यांचा बहर
प्रकाशकणांना जलबिंदूची झालर;

सार्या आसमंतात स्वप्न इवले
उभे स्वच्छंद, शांत खंबीर
जरी दाटला आनंद महामूर.


Please note, आभाळी, तेरडा, कुमुदिनी, कंदील पुष्प (कंदील खरचुडी- परागीकरणासाठी किटकाला फुलात कोंडून ठेवणारं एक संदर दुर्मिळ फुलझाड), सीतेची आसवं, दवबिंदू ही खास कास पठारावर मिळणार्या फुलांची नावं आहेत. इथे तेरड्याची सोवळ्याच्या कदासारखा जांभळाभोर रंगाची फुलं दिसली.  
- स्वाती September 19, 2016 23.03 pm. ( Sept 16 - 18 2016)

सल

कधीतरी ओघळलंच पाहिजे,
घळघळून मोत्यांनी,

नाहीतरी सलच असतात
जीवाच्या गाभार्यात रूतलेली

बंद दाराबाहेर जायलाच लागतं,  झळाळायला, मोत्यांना पण ! 
- स्वाती September 04, 2016 18.58 Pune.

हेडफोन्स

कानांमधे सुरांची दंगल
शहरी मुखवट्यांचं जंगल
कानांमनांत स्वरकल्लोळ

- स्वाती Sept. 02, 2016

संभ्रम

पावसातला सह्याद्री आठवत
खुशालते चेरापूंजीतल्या धुक्यात
अन् खंडाळा घाटातल्या धुक्यात
सुखावते मेघालयाच्या आभासात

कुठं म्हणायचं, कशाला आपलं ?
कोण असतं, कशाला, कोणाचं ?

चार ठाव जगताना
सार्या आकाशाला कवळत
कशाला वागवायचं ओझं वेड्यागत ?

खूणावतं काही दूरून,
की आभासातच ते पण ?

जोडत जायचं काही-बाही
कशाला, उगाच विनाकारण ?

धुक्यातले गुपीत,  क्षणोक्षण टिपत आठवणींचा खेळ,  वा पांघरून कधी स्वप्नांची झालर बसून गप्पगार, विचारात स्वगत
काही करून होईना,  जे गेले व्हायचे राहून काय गरज ज्याची,  जर जगले त्यावाचून.

- स्वाती 14 ऑगस्ट 2016 8.41 am

तीन जणींसाठी हायकू

Image
1.
एक छोटूकली, नादात ठुमकत
येत होती शाळेतनं परत
पावसाच्या धारा, उन्हाचा पिसारा
इवल्याशा पावलांचा लोभस तोरा.

2.

कुठे शून्यात नजर, धुंद जोशात ही पोरं,
रिमझिम पावसात, वळवळता सिगारेटी धूर
गर्द गुलाबी लेऊन, उभे साक्षात जीवन
आब राखत चालली स्वप्ननगरीची लय

3.

आज फिरायला आली, बाई गुंडाळून कामं
झाडावरची पालवी बघे टक लावून
चाल खंबीर, डौलदार असे धुंद नादमग्न
सारे जीवन घालते पायघड्या वाटेतून


क्षण वेचावे छोटेसे मनाला हवेसे,
क्षणा-क्षणांत रमतेअसे जीवन हवे-हवेसे-  स्वाती, August 02 2016

दरम्यान 2

ना आर ना पार
सारं कसं जिथलं तिथे
आपसूक, गप्पगार


आनंद वाढला म्हणत
सूख मानायचं?;
की झाल्या - गेल्या
मनःस्तापाचं ओझं घ्यायचं?;


कशाला काही नावं देत
बिरूदांचं लटांबर जगायचं?


जसं बघतो जिथं - तिथं,
तसंच वाटतं सुटलंय का कोडं?

काय भलं नी कधी वाटतं बुरं !

कधी का हो वाटलं होतं ते खरं?
का ती होती आभासातली अवडंबरं?
की फक्त शालजोडीतली मनाची लटांबरं?


ना गरज, ना उपयोग,
ना प्रयोजन ना सवय,
ना भीती ना धाडस,
असलं लटपटलेलं निरूद्योग


नुसताच अधांतरी चाळा,
कुंपणावरच्या दरम्यानचा,
जित्याच्या खोडीचा,
आडवाटेवरचा फाफटपसारा !


- स्वाती November 15, 2015 22.31

बाईपण

अगं बाई, अगं बाई सकाळी नुसती घाई - घाई डबा, नाश्ता अन् कामावरची तयारी घरची उरकून निघाली कामावर बाई ;
बाईपण और आहे काही केल्या करायचं उरल्यावाचून रहात नाही बाईपणातून भर कामातलं एकटेपण सुटत नाही ;
ढीग्गाराभर कामं सवई सांभाळणं, नखरे झेलणं, मान राखणं अन् समंजस रहाणं, सारं करताना सन्मान सांभाळणं सारं कसं अलवार जमवतं गं बाई?
जीवाला आंजारत, 
गोंजारत,जोजवत फुलवायचं
हे सगळं जस्सं आपल्या -दुसर्यांठी जमवलं
तस्सं आपल्या- आपल्यासाठीपण करायचं
अन् स्वतःसाठी काय-काय केलं तिथं नाही कुढायचं; करायचं, जगायचं, ताठ मानेनं उपभोगायचं !
परोपकाराचं सोंग आणत  कष्टत नाही बसायचं;
रोज करताना गोळाबेरीज दिवसाची   दरवळत आलेल्या सुगंधाने न चुकता  हरखून जायचं;
उलटं दान पदरी आल्यावर रडता रडता पदर खोचून उभं रहायचं, चुकीतून शिकत अन् नव्या चुका माफ करत  कसं गाणं मनातलं ओठावरती जपायचं;
असं गोंजारतं - सावरतं ऋषीपण फक्त बाईपणातच सापडायचं !!

- स्वाती   October  07, 015 15.02

काय ते ठरवूया की !

Image
प्रिय  साथी,

दिवाळीत फटाके वाजवून
अकलेची दिवाळखोरी जाहीर करायची
की करायचा विवेकी विचार? ;
काय ते ठरवूया की !

कोणीतरी जोरात ओरडून सांगतंय
ते खरं मानायचं,
की विचारपूर्वक जगायचं?;
काय ते ठरवूया की !

अग्रेसराची हर आज्ञा प्रमाण,
असेच जगत राहीलो तर
एक दिवस आरशात फक्त कानच दिसतील!
असं होऊ द्यायचं का?;
काय ते ठरवूया की !

आज्ञाकारी सैनिक बनून
आपण जर एक जीव घेतला तर मग
अंत्ययात्रेत मारलेल्या माणसाच्या कलेवरा बरोबर
आपल्यातल्या मेलेल्या माणूसकीचे शव पण असेल!
असं व्हायला हवंय का?;
काय ते ठरवूया की !

कल्पनेतली जुनी वांगी
कोणी नव्याने उकरतंय
ती मुकाट्याने गोड मानायची
की आजची विज्ञान मूल्य धरायची?
काय ते ठरवूया की !

इतिहास आपला अन् संस्कृतीही आपली,
भाषा, भूगोल अन् भ्रमही  आपलेच
भ्रमात ला भोपळा व्हायचं की
विचार-आचारानं विवेकी बनायचं?
एकदाचं काय ते ठरवूया की !


- स्वाती   October 02 2015 18.40

जगता - जगता ....

काय काय गोळा करत असतो ?
कधी इकडे तिकडे विखूरलेल्या
हव्याशा क्षणांची शिदोरी ;

तर कधी गुंडाळून, वाट बदलून
मागे ढकललेले असेच काय काय. ..


पण करतोचना, गोळा - बेरीज?
वेचता, वेचता,
सारे जे जगून चुकले
अन् जगण्यावाचून राहिले

सारा प्रवास हा असा
खरंतर या गणितादरम्यान !
क्वचितच कधी
सारं हवं तसं मांडून
राखत ताठ मान


-   स्वाती   September 03 2015       23.42

अधूर

खुणावते काही दूरून
अधोरेखीत जे 
अधूरेपणात,

अप्रूप वाटूसे
अंधारातले काजवे
बिचकावत होतात 
विचारातून नाहीसे !

क्षणभंगूरशी जवळीक?
की नकळेशी जाणीव?
वा मृगजळी आभास?

लावत आस
शांत, गंभीर, उदास

जाळत अंधारले मन
घनघोर चिंतन, 
पार अस्पष्ट - अधूर ।


- स्वाती  August 21, 2015 14.59

किल्ला

तटबंदी प्रशस्त
चोहोबाजूंनी बंदिस्त
मोकळ्या श्वासासाठी आत
हवेशीर पठार प्रशस्त

कधी बसावे वाटले
ऊन- पाऊस सोडून
खंबीर भुयारी,  ऊब गोंजारत
तरी हलकेच यावी 
कवडशाची चाहूल

अशा किल्ल्यात मोकळ्या
सगे - सोबतांची पानगळ
इथे नसावे सयींचे वादळ
वा पायरवांची वर्दळ

जरी तटबंदीच्या घेरात
जोमाने जगायच्या खेळात,

जगात वादळ - वावटळ
तरी सरळ - निर्मळ
माझ्या किल्ल्यातली हिरवळ- स्वाती, 12  जुलै, 2015 18.05,  Dombivali.