बाईपण

अगं बाई, अगं बाई
सकाळी नुसती घाई - घाई
डबा, नाश्ता अन् कामावरची तयारी
घरची उरकून निघाली कामावर बाई ;

बाईपण और आहे
काही केल्या करायचं उरल्यावाचून रहात नाही
बाईपणातून भर कामातलं एकटेपण सुटत नाही ;

ढीग्गाराभर कामं
सवई सांभाळणं, नखरे झेलणं,
मान राखणं अन् समंजस रहाणं,
सारं करताना सन्मान सांभाळणं
सारं कसं अलवार जमवतं गं बाई?

जीवाला आंजारत, 
गोंजारत,जोजवत फुलवायचं
हे सगळं जस्सं आपल्या -दुसर्यांठी जमवलं
तस्सं आपल्या- आपल्यासाठीपण करायचं

अन् स्वतःसाठी काय-काय केलं
तिथं नाही कुढायचं;
करायचं, जगायचं, ताठ मानेनं उपभोगायचं !

परोपकाराचं सोंग आणत 
कष्टत नाही बसायचं;

रोज करताना गोळाबेरीज दिवसाची  
दरवळत आलेल्या सुगंधाने
न चुकता  हरखून जायचं;

उलटं दान पदरी आल्यावर
रडता रडता पदर खोचून उभं रहायचं,
चुकीतून शिकत अन् नव्या चुका माफ करत 
कसं गाणं मनातलं ओठावरती जपायचं;

असं गोंजारतं - सावरतं ऋषीपण
फक्त बाईपणातच सापडायचं !!


- स्वाती   October  07, 015 15.02

Comments