Friday, June 27, 2014

बंध

आपण एकत्र असू - असू चे नसते झाल्यानंतर
खूप वर्षांनी भेटलो तेव्हा,
समोर फक्त
तुझ्या माझ्यातले बदल होते साक्षीला;

भेटून चक्क बोललो की खंडीभर
तितकी लांबू दिलीच की, - अचानकशी भेट 

वाढल्या वयाची साक्ष देते
तुझे - माझे रुपेरी केस,
अन् आपला समजूतदारपणा !

पण सगळ्या वरताण होऊन
उरलाच एक सहजभाव
तुझ्या  - माझ्यातला ; 

अश्शा अनपेक्षीत भेटीला
तू घालून आलेलास
एक मोतिया रंगाचा झब्बा
जो होता तुझ्या
जगभरातल्या भटकंतींपैकी एकचं सुविनेर

तो झब्बा बघून एकदम खूष झाले
अन् निघता निघता न राहवून
सांगूनच गेले,
'अरे मलापण खूप आवडतो माझा या रंगाचा स्वेटशर्ट
अन् त्याला पण आहे अश्शीच 
बंद गळ्याभोवती नागमोडी नक्षी'. 

आतासुद्धा मजेत असूनही
स्थिर राहीलास तू,
आणि मी ही;

पण झब्ब्याची नागमोडी महीरप हवेमध्ये गिरवून
ही गंमत मी सांगताना मात्र,
तू घेता घेता अर्ध्यावर सोडलास
एक अख्खा श्वास;

तो काय आपल्यातल्या
तटबंद्या आणि ओढीला
अधोरेखित करायला का रे ?


- स्वाती   Dec. 14, 2013.
#MarathiKavita 

Monday, June 2, 2014

तोडफोड

जॉब चं बरं असतं
एक सोडून लगेच
दुसरा घेतो सहजच.

नात्यांचं पण असंच काय?

काही लोकांसाठी तरी
उत्तर होयच!,
नक्की,

बाकीच्यांची मात्र
दमछाक नुसती
नातं जोडताना आणि
नातं तुटल्यावरही.

- स्वाती June 1, 2014 20.20 pm
#MarathiKavita