Posts

Showing posts from March, 2012

आज्जी

Image
सुकलेली बकुळ फुले
पुस्तकातून घरंगळली
जसा सुरकुतला तुझा हात
ज्याने जेवणे रांधली

जेंव्हा आला होता ताप
हवा होता फक्त मऊ-भात
डोक्यावर थोपटत
तुझे मऊशार हात

ताक घुसळते तुझे हात
लोणी काढताना अलगद
गाणे गोड गळ्यात

खेळून प्रपंचाचा खेळ
जरी विरक्ती मनात
काम करण्याची खूब
सार्या नसानसांत

आले कमरे लगत
माझे मऊशार केस
नवी वेणी हवी रोज
काही तरी खास - खास

बंद सारी दारे करून
तू तोर्यात रखवालदार
"हं, होऊ दे हिची वेणी,
नको बघायला कोणी
अस्से गळ्यातले केस."

मी मग एक दिवस
केला गुपचूप बॉब-कट
अर्धी - उघडी मान,
आले नादात मिरवत

माया भरला तळफळाट
तुझे डोळे भरून
माझी पाठ - तुझे हात
आले सुजून, सुजून

तू गेल्या पासून गं 
रोज पडते घराबाहेर
कडी - कुलूपा सोबत,
होते तुझ्या राज्यात
घर उघडे सतत


बंद घरामध्ये आता
श्वास कोंडतही नाही
तशी श्वास घेण्याची
उसंतही असत नाही.

- स्वाती March 5, 2012